श्री.जाधव सर

* दिनविशेष ( दि. ०८/०४/२०१६ ) *

* मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या..

        हार्दिक शुभेच्छा! *

( अनिल जाधव शिरपूरकर )

      सर्वांना आदरपूर्वक नमस्कारासह..

मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या...
           हार्दिक शुभेच्छा!

गुढी पाडवा! अर्थातच ..
चैत्र शुध्द प्रतिपदा! म्हणजेच..
वर्षप्रतिपदा!
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त!
नवीन संवत्सराचा प्रारंभ!
शालिवाहन शकाची (हिंदू कालगणनेची) सुरूवात होवून नवे पंचांगही सुरू होणारा दिवस!
दारोदारी गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत करण्याचा हा दिवस!
शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ, निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव- पालवीने फुललेले असतात. कोकीळेच्या सुमधूर कंठातून फुटणा-या सु-स्वरांनी वसंत ऋतूची चाहूल लागलेली असते.
निसर्गातल्या या परिवर्तनाचे, नव- चैतन्याचे,नव- सृष्टीचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारण्याचा दिवस!
गुढीच्या रुपात प्रतिकात्मक निसर्ग पुजा करण्याचा हा दिवस!
आपल्या दारी मांगल्याचे, पावित्र्याचे, आनंदाचे, विजयाचे व समृद्धीचे प्रतिक म्हणून गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत करण्याचा हा पवित्र दिवस!

         असा हा गुढी पाडवा, मराठी नवीन वर्षाचा प्रथम दिवस होय. याच शुभ दिनी प्रभू श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध करुन, विजयी होऊन आपल्या अयोध्येला परत आले तोच हा  दिवस! 'चैत्र शुध्द प्रतिपदा' चा दिवस! प्रभू श्री रामचंद्र जेव्हा अयोध्येला परत आलेत, तेव्हा अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढया- तोरणे उभारून रामाच्या विजयी आगमनाचा आनंद व्यक्त केला. म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी साजरा केला जातो.
              या दिवशी घरोघरी सगळेच जण पहाटे लवकर झोपेतून उठतात.  मंगलस्नान करतात आणि सुर्योदयाच्या वेळी म्हणजेच ब्राह्म मुहुर्तावर नववर्षाच्या स्वागताची गुढी उभारतात. सकाळी सूर्योदयाला आंब्याच्या डहाळ्यांचे व फुलांचे तोरण मुख्य दारावर लावतात.  घराबाहेर अंगणात मोठी रांगोळी काढतात.दाराच्या उजव्या बाजूस छोटा लाकडी पाट गुढी उभारण्यासाठी मांडला जातो. हा पाट  मांडण्याची जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर वा बाजूने रांगोळी काढतात. बांबूची एक उंच काठी घेवून तिला आधी पाण्याने स्वच्छ करुन घेतात. त्या काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांची माळ, साखरेची गाठी ह्या वस्तू बांधतात. या वस्तू बांधलेल्या भागावर तांब्या-पितळ्याचा अथवा कास्याचा गडू उपडा लावतात.
------------------------------
आपण वाचत आहात..
प्रत्येक मराठी घराचे संस्कारक्षम पेज..
       "संस्कार व शिक्षण जागृती!"
https://m.facebook.com/sanskarvashikshanjagruti
------------------------------
 ही अशी तयार केलेली गुढी, आपल्या दारांत लावण्यासाठी तयार केलेल्या पाटावर उभी करुन गुढीची काठी तिथे नीट बांधून गुढी उभारतात. गंध, फुलं, अक्षतांनी गुढीची पूजा करतात. निरांजन लावून उदबत्ती दाखवितात. दुध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य पुजासमयी गुढीला दाखवितात. नंतर दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी नैवेद्य म्हणून मुख्यत्वे करून पुरणपोळी, पुरणाची आमटी (कटाची आमटी), भजी-पापड-कुरडया वगैरे तळण, शेवयांची खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणांप्रमाणेच करतात.

           या पाडव्याच्या शुभदिनी नव्या वर्षाचे संकल्प केले जातात व परस्परांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
आणि हो...
या दिवशी अगदी जाणीवपूर्वक कडुलिंबाच्या पानांचे सेवनही केले जाते; कारण कडुलिंबाच्या पानांच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वचा रोग बरे होतात. आपल्याला चवीला कडु लागणारी कडुलिंब ही वनस्पती आरोग्यदायी व कीटकनाशक आहे.  धान्यांतली कीड थांबविण्यासाठी व इतरही ठिकाणी या कडुलिंबाच्या पानांच्या औषधीगुणांचा वापर केला जातो!
   
     अशाप्रकारे कडुलिंबाची पाने खावून आरोग्याकडे लक्ष द्यावे जेणेकरुन आपल्या आयुष्यभरातील प्रत्येक दिवसाला (दिवसरुपी पर्णांना) सुख फुलावे, गुढीवरील भरजरी वस्रासम ऐश्वर्य येवून उच्च प्रतीचे जीवन जगण्याचा आपला स्वभाव तयार व्हावा, साखरगाठींच्या गोडव्यासम आनंद क्षणोक्षणी लाभावा, गुढी काठीच्या सारखे स्थैर्य आपल्याला लाभावे असा संदेश देणारी ही गुढी
मांगल्याचे, पावित्र्याचे, आनंदाचे, विजयाचे व समृद्धीचे प्रतिक म्हणून आपल्या दारी दिमाखात या दिवशी उभारली जातेय!

       अशा या दिमाखदार सणाला व आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेला मानाचा मुजरा!

       रितीरिवाजानुसार चारोळीने समारोप करुन आम्ही आपला निरोप घेतो!

                * चारोळी *

* मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या..

        हार्दिक शुभेच्छा! *


मोहोरुनी कडुलिंब पर्णोपर्णी सुख फुलावे,

भरजरी वस्रासम ऐश्वर्य यावे हे स्वभावे;

साखरगाठींच्या गोडव्यात आनंदे झुलावे,

गुढीकाठीसम स्थैर्य सदा जीवनी लाभावे!




* हे नुतन मराठी वर्ष...

आपणांस व आपल्या परिवारास..

सुख-समृध्दी, यश, भरभराट व आरोग्यदायी जावो हिच श्री ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना!


© अनिल जाधव शिरपूरकर.


https://m.facebook.com/sanskarvashikshanjagruti

No comments:

Post a Comment